मावळत्या उन्हात – चितस्थधि


कधी मावळत्या उन्हात

सावल्यांचं अनंतात विलीन होणं
नुसतं एकाकी बसून बघ,
तुझ्यातलंही काही त्या डोहात मिसळतंय असं वाटेल..
ते गरगरणं आणि बेभान घोंघावणं वाऱ्याचंही असेल,

आणि तुझ्यातल्या स्वत्वाचंही…

त्या डोहात,
ऐकू येतील हाका
ज्या वास्तवाचे तट ढासळून शिरतील
त्या साठवून ठेव मनात,
तुलाच उमजेल
किती वाटसरू आणि किती वाटा
तुझ्या छायेत बिलगल्या

मग विरून जाऊदेत या हाकांच्या लाटा
तसंही त्यांचं अस्तित्व होतंच तुझ्यासाठी
आणि तुझ्यातूनच
– चितस्थधि

Leave a Comment