दंवबिंदूंनी भिजलेली पाऊलवाट

दंवबिंदूंनी भिजलेली पाऊलवाट,
अंधारल्या पावलांनी चालत राहावी;
प्रत्येक पाऊल खोल काळ्याशार समुद्रात उतरत जावं तसं,
अज्ञात गारव्यानं भरून यावं..
मध्येच एखादी गवताची पाती पायाखाली यावी अन संपूर्ण आयुष्य शहारून निघावं,
त्या मऊसर स्पर्शानं..
कधी बारीकशी खडी टोचून जावी तळव्यांना,
वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी..
कधी शांत निर्झर फुटावा त्या वाटेवरून,
पूर्वसूरींची पायधूळ वाहून आणणारा ;
अन सर्वांगात पाण्यातून ती माती मिसळावी,
सर्व जाणिवांसकट…
बोथट झालेल्या जाणिवा भरून निघाव्यात,
त्या लेपानं..
अशातच रानफुलांनी डोलून उठावं,
चिरपरिचित विलक्षण सुगंध उधळावा;
वाट सोडून पाय इतस्ततः बागडावेत,
फुलपाखरांचे पंख लावून…
रंगज्ञानाचा गर्व होईल इतकी डोळं भरून पहावी,
ही रंगांची पखरण…
तशातच,
हर्षोल्हासित क्षणांची कुपी रिकामी व्हावी,
समाप्तीच्या समयी,
ओसंडून वाहत असल्याची ग्वाही द्यावी,
संपूर्ण शरीरानं,
अन मनानं केव्हाच त्याला अनुमोदन द्यावं..
दिवस बुडत असताना,
रात्र आरंभ होताना,
निसर्ग उत्सव साजरा करतो तेव्हा,
अंत नावाची पाऊलवाट धरावी,
हे सारं पुन्हा अनुभवण्यासाठी….
चितस्थधि

Leave a Comment