चंद्रशेखर गोखले – लेख


तिच्या लग्नाच्या रुखवताची आँर्डर त्याच्या बहिणीला मिळाली बहिणीने त्यालाच मदतीसाठी बोलावलं , बहिणीला मदत म्हणून तो गेला….त्याला नोकरी नाही म्हणून ती त्याच्याबद्दल घरी बोलू शकली नव्हती आणि आता तर तिचं लग्नच ठरलं होतं…
बहीण म्हणाली काहीतरी नवं करूया …..
त्याने रावळगाव चाँकलेटाच्या चांदीच्या बाहुल्या बनवल्या… बहिणीला हा प्रकार अगदी नवा वाटला तो मनात हसला ते दोघे भेटायचे तेंव्हा बोलता बोलता हातला चाळा म्हणून तो अशाच बाहुल्या करून तिला द्यायचा डोक्याचा पसरट भाग,दोन बाजूला पीळ देऊन बनवलेल्या दोन वेण्या आवळून तयार केलेला गळा आणि मग चांदी पसरवून केलेला बाहुलीचा फ्राँक… बहीण म्हणाली अशा अजून बाहुल्या बनव आपण त्याना फेर धरून नाचतायत असं दाखवूया… नवा अँटम ठरेल.. रुखवतात नवा अँटम असला तर चार पैसे अधीक मिळातात.. बहीण बोलत होती त्याच्या भोवती तिला करून दिलेल्या बाहुल्यानी कधीच फेर धरला होता… त्या बाहुल्या ती पण फार मायेनं जपायची भुवनेश्वराहून आणलेली शिंपल्याची डबी त्या बाहुल्या जपून ठेवायला वापरायची.. सव्वाशे बाहुल्या झाल्या की आपण लग्न करू अस ती म्हणायची.. सव्वाशे अडिचशे तिनशे किती बाहुल्या झाल्या मग तिने मोजणं बंद केलं आणि मग दोघांचं भेटणं ही बंद झालं
त्याच्या मनातल्या आठवणींप्रमाणे त्या बाहुल्या शिंपल्याच्या डबीत कायमच्या बंद झाल्या.
..बहीण खूप खूश होती म्हणाली तू असलास की मला काळजीच नसते… ती पण असच म्हणायची तू आहेस.. मला कसली काळजी?..ती खांद्यावर डोकं ठेऊन विसावली की तो सुखावायचा… अत्ता बसल्या बसल्या त्याचा एकाएकी खांदाच भरून आला… खरं तर ऊर भरून आला डोळे भरून आले गळा दाटून आला…आपण फूटून जाऊ असं त्याला वाटत असतानाच बहिणीचं त्याच्याकडे लक्ष गेलं, त्याची अवस्था बघून ती कासावीस झाली.काय होतय काय होतय म्हणायला सवडच मिळाली नाही कारण तेव्हढ्यात फोन वाजला त्याला थोपटत बहिणीने फोन घेतला… बरं झालं तेंव्हाच फोन आला त्याला स्वत:ला सावरायला,मोकळं व्हायला वेळ मिळाला, कधी कधी स्वत:च्या तावडीतूनही आपली सुटका करून घ्यावी लागते, त्याचं तसं झालं होतं , मी ठीक आहे म्हणत तो सावरून बसला जसं सगळं दाटून आलं तसच क्षणात निवळलं…
पण बहिणीचा मूड गेला तिच्या घरूनच फोन होता… तिचं लग्नं मोडलं होतं रुख्वताची आँर्डर रद्द झाली होती , पाच हजाराचं काम होतं वर हजार पाचशे ती जास्तं मिळवणार होती…सगळच बारगळलं
तितक्यात याचा फोन वाजला तिचा फोन होता तिने सांगितलं मी लग्न मोडलं , मी खूप विचार केला आणि शेवटी आई बाबाना सांगितलं मी सूखी होईन तर तुझ्या बरोबरच काय व्हायचं ते होऊदे… माझी तुझ्या सोबत पाठवणी करा.. बाबांचा नाईलाज झाला ते आता मुलाकडे हे सांगायला गेलेत आईला तर तू आधीपासूनच पसंत होतास… तुला आईने भेटायला बोलावलय संध्याकाळी नक्की ये..
त्याला काय करायचं कळेचना.. तो भराभर चांदीच्या बाहुल्याच करत सुटला… बहीण वैतागली म्हणाली आता याचा काय उपयोग आहे?…
जेंव्हा तिला याचा उपयोग कळेल तेंव्हा तिला किती आनंद होईल ना…


-चंद्रशेखर गोखले

Leave a Comment