एकदा ते स्वप्न – चितस्थधि

एकदा ते स्वप्न – चितस्थधि,एकदा ते स्वप्न पूर्ण करावंच म्हणतो ,जे सोडलं होतं साखरझोपेत असताना .


एकदा ते स्वप्न पूर्ण करावंच म्हणतो ,

जे सोडलं होतं साखरझोपेत असताना .
पूर्ण करावा अर्धवट चित्रांचा पसारा ,
केटी चा बॅकलॉग भरून काढावा तसा.

मला कधी चित्रं काढता आली नाहीत वळणदार रेषांची,

पण सदा वाटला मुक्त उधळून द्यावा रंग ;
ते चित्रच ठरवेल त्याच्या रेषा आणि सीमा .

तरीही एकच फ्रेम असते डोळ्यांत स्वप्नातही,

पण कधीच रंगवून नाही होत
तुझ्या उभ्या चेहऱ्यावरची कपाळावरची
लाल आडवी रेघ ….
जाग येते ,खोडा घालते आणि झोप काढता पाय घेते ,
उन्हं आल्यावर…..

मग पुन्हा जागेपणी तीच धुंदी घेऊन हजारदा निद्रिस्त होतो ,

ह्या भयंकर जागृत दुनियेपासून….

ह्या जागलेपणाच्या सुया टोचून घेऊन

जगण्याचं विष कालवून घ्यायला येतो इथं जन्माला प्रत्येकजण ,
काही लवकर उठून जातात विष भिणून…
तर काही पचवून निळकंठ होतात नामानिराळे…

इतकं भरून उरतो सुखासीन

म्हणून स्वीकारतो राज्य रिकामेपणाचं
जसा आत्मज्ञानी ओढतो एकाकीपण
गोसाव्यानं नाम ओढावा तसा……

ह्या सगळ्या उठाठेवीत संध्याकाळ होते ,

पुन्हा तीच फ्रेम डोळ्यासमोर येते…..
पुन्हा हात घालतो क्षितिजावरच्या लाल रंगात ,
तोच आडवा पट्टा ओढण्यासाठी ……
पण नाही होत …..
मीच नाही करत
का ??
मग उद्या कोणतं स्वप्न पडणार ??
हे पूर्ण झाल्यावर ??

म्हणून ,

घेऊन फिरतो रोज
सकाळ-संध्याकाळची रंगांची उतरंड,
वाहतो अपुऱ्याची कावड…

प्रत्यक्षात येईल तेव्हा पूर्ण होईल कदाचित

तशीच
तू वाचल्यावर हि कविताही होईल पूर्णत्वाही धनी ….

– चितस्थधि(सागर कुर्डे)

Leave a Comment