अंतराळहीन अवकाशात – चितस्थधि


अंतराळहीन अवकाशात,
प्रतिकर्षणाचं अस्तित्व नाकारता येतं तसं,
नेणिवेच्या जंगलात जाणिवेच्या नितळ किरणांनी लपंडाव खेळावा…
अंधाराने उजेडाच्या डोळ्यांवर पांघरून घालावं अन,
संहाराच्या तांडवाग्नीत सृजनाची बीजं पडावीत तसं….

दंवबिंदूच्या अस्तित्वानं एक एक पाकळी उमलत जावी तसं…
ओल्या पापणीतून बंद होताना टपोरा थेंब ढळावा,
ग्रीष्माच्या भेगांतून वळीवाचा थेंब मिसळावा,
निराकार मातीच्या कणांवर निर्मिकाचा हात फिरावा तसं….

आठवांच्या कळ्यांनी जीवनमाला गुंफत उमलत जावं तसं…
निराशेच्या वळ्यांनी अंतस्थाला स्फुंदत नितळत जावं अन
आनंदाच्या क्षणांनी दिवसागणिक वितळत जावं,
अस्पष्ट चित्र रेषांगणिक स्फुरत जावं अगदी तसं….

ह्या सर्व योगायोगांनी विधिलिखितं बनून यावं,
या निर्जन मनात रुजून जावं असंच…
कित्येक कल्प आणि मन्वंतरं ह्या वर्षावात,
एक एक थेंब भिजत जावं असंच…
पुन्हा पुन्हा वाटत राहिलं..
अगदी तसंच…

-सागर कुर्डे (चितस्थधि)

Leave a Comment